महाराष्ट्रात आज (4 जुलै) नवीन 9,336 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आज 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नवीन 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,23,225 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,23,030 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स, महाराष्ट्रात आज 123 जणांचा मृत्यू - corona update state
22:44 July 04
महाराष्ट्रात आज नवीन 9,336 जणांना कोरोना, 123 मृत्यू
20:41 July 04
मुंबईत आज 548 जणांना कोरोना, 24 मृत्यू
मुंबई - मुंबईत आज नव्या 548 रुग्णांची नोंद झाली आहे. 24 मृत्यूची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईची एकूण रुग्णसंख्या 7 लाख 24 हजार 678 वर पोहोचली आहे.
20:36 July 04
धारावीत आज पुन्हा शून्य रुग्ण आढळले
मुंबई - धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं आहे. धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत.
15:33 July 04
नागपुरात 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू
नागपूर - नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात 12 दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. या बाळाची जन्मानंतर पाच दिवसांनी प्रकृती गंभीर झाली होती. त्या मुलाचे हृदय कमजोर होते. त्यात त्याला कोरोनाही झाला होता. यामुळे त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेले सर्वात कमी वयाचे हे पहिलेच बाळ असल्याचे बोलले जात आहे.
मध्य प्रदेशच्या शिवनी येथील महिलेला प्रसूतीसाठी नागपूरच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची प्रसूती होण्यापूर्वी 20 जूनला कोरोनाची चाचणी करून घेण्यात आली. यामध्ये महिलेचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिची प्रसूती सुरक्षित झाली. पण बाळाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्या मुलाचे हृदय कमजोर होते. त्यात पाच दिवसानंतर बाळाला ताप आल्याने प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याचा 26 जूनला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अखेर उपचारादरम्यान जन्मानंतर 12 व्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
11:37 July 04
43 हजार 71 नवीन कोरोनाबाधित आढळले, ९५५ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली- देशात गेल्या २४ तासांत 43 हजार 71 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 52 हजार 299 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे असून 955 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3,05,45,433 वर पोहोचली असून आतापर्यंत 2,96,58,078 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या 4,85,350 सक्रिय रुग्ण असून मृतांची संख्या 4,02,005 वर पोहोचली आहे. तर देशात एकूण 35,12,21,306 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
06:39 July 04
राज्यात शनिवारी ९ हजार ४८९ नवीन कोरोनाबाधित; ८ हजार ३९५ कोरोनामुक्त
मुंबई - राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात ९ हजार ४८९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तसेच दिवसभरात ८ हजार ३९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात मागील काही दिवसांमध्ये सातत्याने कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत होती. राज्यात शनिवारी १५३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.