मुंबई -कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्यानंतर यावर नियंत्रण मिळण्यामध्ये काही अंशी राज्य सरकारला यश आले आहे. राज्यात असलेल्या 47 कारागृहांमध्ये असलेल्या एकूण कैद्यांपैकी तब्बल 35, 357 कैद्यांची कोरोनाचाचणी घेण्यात आली होती. ज्यामध्ये 2505 कैदी हे बाधित झाल्यानंतर आतापर्यंत यापैकी 2470 कैदी कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. मात्र दुर्दैवाने आतापर्यंत 7 कैद्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे कारागृह कर्मचाऱ्यांची कोरोनाचाचणी सुद्धा घेण्यात आली होती ज्यामध्ये 545 कारागृह कर्मचाऱ्यांपैकी 532 कारागृह कर्मचारी हे कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले आहेत. दुर्दैवाने आतापर्यंत 8 कारागृह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यात 8 कारागृह कर्मचाऱ्यांचा मृत्यू
राज्यातील वाशिम जिल्हा कारागृह, अमरावती मध्य कारागृह, बोरसल कारागृह, बीड जिल्हा कारागृह, औरंगाबाद मध्य कारागृह, विसापूर मध्य कारागृह, येरवडा मध्य कारागृह, तळोजा मध्य कारागृह, या ठिकाणी प्रत्येकी 1 कारागृह कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
7 कारागृह कैद्यांचा मृत्यू
तळोजा मध्य कारागृहातील 2 कारागृह कैद्यांचा मृत्यू झाला असून पुण्यातील येरवडा कारागृहातील 2 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच सोलापूर जिल्हा कारागृहातील 1 कैद्याचा मृत्यू झाला असून धुळे जिल्हा कारागृहात 1 कैद्याचा तर अमरावती मध्य कारागृहात 1 कैद्याचा मृत्यू झाला आहे.
'या' कारागृहात सर्वाधिक कोरोनाचाचण्या
मुंबई मध्यवर्ती कारागृहात तब्बल 1713 कैद्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून ठाणे मध्यवर्ती कारागृहात 1567 कैदी, तळोजा मध्यवर्ती कारागृहात 4266 कैद्यांच्या कोरोणा चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील महिला कारागृहातील 272 महिला कैद्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कल्याण जिल्हा कारागृहात 2857 कैद्यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून, पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्वाधिक 5016 कैद्यांच्या चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात 1888, नाशिक मध्यवर्ती कारागृहात 2135 कैद्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
राज्यातील एकूण कारागृहात 23, 217 कैदी ठेवण्याची क्षमता असताना सध्याच्या घडीला 30, 701 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.