मुंबई - मुंबईमध्ये मे महिन्यापासून पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले ( Corona Increasing in Mumbai ) आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. कोरोना रुग्ण आढळून येणारी इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात येत होती. मात्र सध्या कोरोना रुग्ण आढळून आलेली मुंबईमधील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही. इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्याबाबत नव्या गाईडलाईनची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रसार -मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर मुंबईत तीन लाटा येऊन गेल्या. पहिल्या लाटेत दिवसाला २८००, दुसऱ्या लाटेत ११ हजार तर तिसऱ्या लाटेत २१ हजार असे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या तीनही लाटा थोपवण्यात राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला यश आले आहे. आतापर्यंत १० लाख ८० हजार ७४७ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. १० लाख ५० हजार २८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १९ हजार ५७३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सद्धा इमारत, झोपडपट्टी सील नाही -मुंबईत मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली होती. जानेवारीत ही लाट आटोक्यात आली. त्यानंतर मेमध्ये दिवसाला ५० हून कमी रुग्णांची नोंद होत होती. मे पासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. जूनमध्ये दिवसाला १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पॉजिटीव्ह येणाऱ्या रुग्णांना घरीच होम क्वारंटाईन केले जात आहे. पॉजिटीव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन केले जात असले तरी मुंबईतील एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील करण्यात आलेली नाही.
सील करण्याची नियमावली -मुंबईत मार्च २०२० पासून तिसऱ्या लाटेपर्यंत २७९८ झोपड्या सील करण्यात आल्या होत्या. ६६ हजार ३३६ इमारती आणि मायक्रो कंटेंटमेंट झोन सील करण्यात आले होते. पहिल्या लाटेत इमारत किंवा झोपडपट्टीत एक रुग्ण आढळून आला. तरी ती सील केली जात होती. त्यातनंतर बदल करून एका इमारतीत ५ रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जात होती. मात्र तिसऱ्या लाटेत ओमायक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारादरम्यान इमारत आणि झोपडपट्टी सील करण्याबाबत नवीन गाईडलाईन तयार करण्यात आली. त्यानुसार एका इमारतीत २० टक्के घरांमध्ये पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आल्यास किंवा एका घरात १० रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आल्यास इमारत सील करण्यात येईल अशी नियमावली करण्यात आली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
म्हणून इमारती सील नाहीत -मुंबईत सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी ९६ ते ९७ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची किंवा ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहे. यामुळे मुंबईत रुग्णसंख्या वाढली तरी भीतीचे कारण नाही. पालिकेचे त्यावर लक्ष आहे. नवीन नियमावली प्रमाणे २० टक्के घरांमध्ये रुग्ण आढळून आले तरच इमारत सील करता येते. या नियमावलीमुळे मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.