मुंबई- दक्षिण मुंबईतील जुन्या-मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतीचे सर्व्हेक्षण दरवर्षी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून करण्यात येते. त्यानुसार मे अखेरीस अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येते. जेणेकरून पावसाळ्यात इमारत कोसळण्याची दुर्घटना झाल्यास कोणतीही जीवित हानी होऊ नये. गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्व्हेक्षण रखडले होते. पण त्यानंतर घाईघाईत सर्व्हे करत उशिरा अतिधोकायक इमारतीची यादी जाहीर करण्यात आली होती. हीच परिस्थिती यंदाही आहे. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असून लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परिणामी यावेळीही प्रत्यक्ष इमारतीत जाऊन सर्व्हेक्षण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ 30 टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. या माहितीनुसार 15 मे पर्यंत सर्व्हे पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जात आहे.
अंदाजे 16 हजार उपकरप्राप्त इमारती
दक्षिण मुंबईत 50 ते 100 वर्षे वा त्याहून अधिक जुन्या इमारती आहेत. या इमारती उपकरप्राप्त असून या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती मंडळावर आहे. त्यानुसार मंडळ सरकारकडून मिळालेल्या निधीतून इमारतीची दुरुस्ती करते. तर पुनर्विकासाला परवानगी देते. पण आतापर्यंत या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आजही 16 हजार इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्वच इमारती धोकादायक असून या सर्व इमारतीचा शक्य तितक्या लवकर पुनर्विकास होणे गरजेचे आहे. पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे हा पुनर्विकास मार्गी लागत नसल्याचा आरोप सर्वच स्तरातून होताना दिसतो.