मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोना विषाणूच्या तीन लाटा येवून गेल्या. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या घटू लागली. मात्र मे अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे. एप्रिलमध्ये ३० ते ३५ वर असलेली रुग्णसंख्या आता सुमारे दोन हजाराच्या घरात गेली आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर जवळपास सात पट्टीने खाली घसरला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढते आहे.
कोरोना पसरला -मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढली. त्यामुळे पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या तब्बल ११ हजारावर तर तिसऱ्या लाटेत २१ हजारावर पोहचल्याने यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले. मात्र प्रभावी उपायोजना, उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी, संशयित रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, नियमित हेल्थ कॅम्प, लसीकरण मोहिम आदी प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले.