महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईकरांची चिंता वाढली : नऊ दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी ३१० दिवसांनी घसरला - corona doubling rate in mumbai

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी गेल्या ९ दिवसात ३१० दिवसांनी कमी झाला आहे. यावरून मुंबईमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

corona
कोरोना संग्रहित फोटो

By

Published : Aug 28, 2021, 7:32 PM IST

मुंबई -मुंबईमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येत असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात रुग्णसंख्या वाढल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊ लागला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी गेल्या ९ दिवसात ३१० दिवसांनी कमी झाला आहे. यावरून मुंबईमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसत आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

  • रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला -

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाला. त्यावेळी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्या कमी होत असल्याने त्यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ५३४ दिवसांवर पोहचला होता. फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला ११ हजार रुग्ण आढळून येऊ लागले. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी ४० दिवसांवर आला होता. ऑगस्ट दरम्यान पुन्हा रुग्णसंख्या कमी झाली. दिवसाला सुमारे २०० ते ३०० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे १८ ऑगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी २०५७ दिवसांवर पोहचला होता. मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढू लागल्याने २७ ऑगस्ट रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी १७४७ दिवसांवर घसरला आहे. गेल्या ९ दिवसात ३१० दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला आहे.

  • ७ लाख ४२ हजार नागरिकांना कोरोना -

मुंबईमध्ये गेल्या वर्षी ११ मार्चला पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. तेव्हापासून २७ ऑगस्टपर्यंत गेल्या दीड वर्षात ७ लाख ४२ हजार ७६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ लाख २१ हजार ४७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १५ हजार ९६८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २ हजार ८८० सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण दुपटीचा कालावधी १७४७ दिवस इतका आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३१ इमारती तर १०५६ मजले सील करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

  • तर पुन्हा लॉकडाऊन -

मुंबई महापालिकेने जिनोम सिक्वेनसींग चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यात १८८ पैकी १२८ नमुने डेल्टाचे आढळून आले आहेत. रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. जे तज्ञ सांगत आहे, त्यानुसार एका दिवसाला आपल्याला अनेक रूग्ण सापडतील, त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी केले आहे. तसेच रूग्ण संख्या वाढली, तर आपल्याला पुन्हा लॅाकडाऊन करावे लागेल. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचेही त्या म्हणाल्या.

  • असा घसरला दुपटीचा कालावधी -

दिनांक रुग्णदुपटीचा कालावधी
१८ ऑगस्ट २०५७ दिवस
२२ ऑगस्ट २०३० दिवस
२३ ऑगस्ट १९८३ दिवस
२४ ऑगस्ट १९५८ दिवस
२५ ऑगस्ट १८८४ दिवस
२६ ऑगस्ट १८२५ दिवस
२७ ऑगस्ट १७४७ दिवस

हेही वाचा -PHOTOS ''काय खरं काय खोटं'' : लंडनमध्ये शुटिंग करताना प्रियंका चोप्राच्या चेहऱ्याला दुखापत

ABOUT THE AUTHOR

...view details