महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मुंबईला वाचवा.. शहरातील कोरोनाचे मृत्यू लपवण्यात आले, हा अक्षम्य गुन्हा'

आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis-uddhav thackeray
देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे

By

Published : Jun 16, 2020, 8:16 PM IST

Updated : Jun 16, 2020, 9:08 PM IST

मुंबई - आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर सरकार आणि पालिकेने काहीही कारवाई न केल्याने फडणवीसांनी आज पुन्हा एकदा तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. ज्यात त्यांनी, सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या 'डेथ ऑडिट कमिटी'कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.

हेही वाचा...अखेर राजू शेट्टी राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होणार; गोविंद बागेत शरद पवार अन् शेट्टींची भेट

तथापि 'डेथ ऑडिट कमिटी'ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखवण्याचे काम 'डेथ ऑडिट कमिटी'ने कोणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे. असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु हा प्रश्न उपस्थित केला गेला तरीही अजून राज्य सरकारने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सरकारने त्वरित पाऊल उचलावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना ते मृत्यूव कोरोना असल्याचे दाखवण्यात आले नाहीत. कोणते मृत्यू कोरोना मृत्यू आहेत अथवा नाहीत, याबाबत तीन वर्गवारी आयसीएमआरने दिल्या आहेत. परंतु, येथे कमिटीने मनात येईल त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू ठरवले आहेत. ही बाब केवळ अक्षम्य नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कोरोनासंदर्भातील संपूर्ण माहिती योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात. अशात या दोन्ही प्रकारांकडे पाहता मुंबईत सुमारे 950 पेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे अधिकचे झालेले आहेत. पण, त्यांची नोंद अद्याप झालेली नाही. मुंबईतील कोरोनाची दाहकता यामुळे अधिक स्पष्ट होते. त्यामुळे असे गैरप्रकार करणार्‍यांवर त्वरित कठोरातील कठोर कारवाई करावी, असे फडणवीसांनी म्हटले आहे.

महापालिकेने आकडे लपवलेले नाहीत : महापौर

कोरोना मृतदेह लपवल्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस हे पालिका प्रशासने आणि राज्य सरकार यांना लक्ष करत असताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेने कोरोना मृत्यूचे आकडे लपवले नाहीत, असे म्हटले आहे.

प्रत्येक रुग्ण रुग्णालयात गेल्यावर आणि जर त्याचा त्यानंतर मृत्यू झाल्यास, त्याच्या नातेवाईकांकडे मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते. त्यावर जी नोंद असते त्याची माहिती राज्य सरकरकडे दिली जाते. मृत्यू प्रमाणपत्रावर कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास त्याच्या मृत्यूची नोंद कोरोना मृतांमध्ये केली जाते. काही लोकांचा घरीही मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोणत्या कारणाने मृत्यू झाला, हेही पाहावे लागेल. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात संवादात काही अडचण आली असेल परंतु महापालिकेने आकडे लपवलेले नाहीत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Last Updated : Jun 16, 2020, 9:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details