मुंबई -कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकर्या गेल्या आहेत. अजून परिस्थिती सुधारली नसल्यामुळे अनेकांच्या नोकर्या जाण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली येऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामकाजावर होण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
अनेकजणांच्या नोकरीवर टांगती तलवार-
जगातील ९९ देशांमधील १४०० कंपन्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजावर झालेल्या परिणामाचा सर्व्हे इंटरनॅशनल एसओएसने इप्सोस मोरी, या संशोधन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. यामध्ये भारताचाही समावेश होता. कोरोनाचा फटका कर्मचार्यांच्या उत्पादन क्षमतेला बसला असला तरी पुढील वर्षी कोरोनापेक्षा सर्वाधिक फटका हा मानसिक तणावाचा बसणार आहे. लॉकडाऊनमुळे उत्पादन क्षमतेत घट झाल्याने अनेकांच्या नोकर्या गेल्या. तर अनेकजणांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. त्यामुळे बहुतांश कर्मचारी मानसिक तणावाखाली आले आहेत. याचा परिणाम येत्या वर्षात दिसण्याची शक्यता आहे.
मानसिक तणावाचा सर्वाधिक फटका बसणार-
त्याचबरोबर पुढील वर्षात कोरोनाबरोबरच मलेरिया, डेंग्यू, इबोला आणि झिका यासारख्या संसर्गजन्या आजारांचा परिणामही कर्मचार्यांच्या कामावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संसर्गजन्य आजारांचा ९१ टक्के परिणाम कर्मचार्यांच्या कामाकाजावर होणार असल्याचे मत सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या व्यावसायिकांनी मांडले आहे. संसर्गजन्य आजारामुळे कामावर परिणाम होणार असला तरी मानसिक तणावाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे इंटरनॅशनल एसओएसच्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. यावर्षी कोरोनामुळे उत्पादन क्षमतेवर झालेल्या परिणामापेक्षा मानसिक तणावामुळे कामावर होणारा परिणाम अधिक असणार आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा घरगुती कर्मचारी (८५ टक्के), सहाय्यक (८१ टक्के), विद्यार्थी आणि शिक्षक (८० टक्के) कामगार आणि व्यवसाय प्रवासी (७९ टक्के), असा असल्याचे सर्व्हेक्षणात म्हटले आहे.