मुंबई - मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली (Corona Cases Hike Again in Mumbai) आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी पालिका सज्ज (BMC on Corona Cases) असून सध्या तरी निर्बंध लावण्याची गरज नाही, मात्र रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत राहिल्यास निर्बंधांबाबत विचार करू, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईत पहिला रुग्ण मार्च 2020 मध्ये आढळून आला. गेल्या दोन वर्षात मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आणण्यात महापालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करताना मास्क ऐच्छिक केले आहे. यामुळे नागरिकांनी मास्क घालणे बंद केले आहे. तसेच कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी नागरिकांकडून केली जात नसल्याने कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.
हेही वाचा -XE Variant Maharashtra : नव्या व्हेरियंटबाबत महाराष्ट्राने सतर्क रहावे - डॉ. भारती पवार
पुन्हा रुग्णसंख्या वाढतेय -मुंबईत पहिल्या लाटेत दिवसाला 2800, दुसऱ्या लाटेत 11 हजार तर तिसऱ्या लाटेत 21 हजार रुग्ण एका दिवसात आढळून आले होते. जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आली. मागील महिन्यात दिवसाला ५० हुन कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र १३ एप्रिलला ७३, १९ एप्रिलला ८५, २० एप्रिलला ९८, २१ एप्रिलला ९१ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने पालिका अलर्ट झाली आहे.