मुंबई -सकस आणि ताज्या दुधाच्या मागणीमुळे मुंबईसह उपनगरात शेकडो म्हशींचे तबेले अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तबेल्यातून थेट ग्राहकांपर्यंत दुध पोहोचवण्याचा मोठा व्यवसाय या तबेला व्यवसायिकांमार्फत केला जातो. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनचा विपरित परिणाम आता या व्यावसायिकांवर झालेला आहे. किंबहुना त्यांच्यावर तबेला 'लॉक' करण्याची वेळ आलेली आहे.
कोरोना लॉकडाऊनचा तबेला मालकांना फटका... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने कामगारांनी आपल्या गावाकडे वाट धरली. त्याचा परिणाम मुंबईतील तबेल्यांवरही जाणवू लागल्याचे ईटीव्ही भारतने घेतलेल्या आढाव्यात दिसून आले.
हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष : कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना रानभाज्यांचा 'आधार'
तबेला मालकांवर व्यवसायात तग धरण्याची टांकती तलवार....
मुंबई आणि उपनगरात जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार अथवा परराज्यातील आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक मजूर आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे तबेला मालकांवर व्यवसायात तग धरण्याची टांकती तलवार आहे.
लॉकडाऊन काळात दुधाचे उत्पादन घटले...
कोरोनामुळे मुंबईतून मोठया संख्येने कामगार कुटुंबियांसह गावी गेलेत. त्यामुळे दूध विकणार कुठे हा प्रश्न तबेलाधारकांना पडला आहे. परिणामी दुधाचे उत्पादन घटले. लॉकडाऊन आधी एका म्हशी मागे सरासरी 8 लीटर दूध काढले जायचे, आता ते प्रमाण 6 ते 7 लीटर इतके कमी झाले आहे, असे 'आरे' येथील युनिट नंबर 28 मधील तबेला मालक रसूल इस्माईल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा...दोन दिवसाच्या विश्रातीनंतर मुंबईत मुसळधार पाऊस, वातावरणात गारवा
कामगार कमी असल्याने मालकांना काहीवेळा करावे लागत आहे काम...
तबेल्यात काम करणारे बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेश अथवा बिहार प्रदेशातील आहेत. ते लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परत गेले. त्यामुळे तबेलामालकांना आता तबेल्यात अनेकदा काम करावे लागत आहे.
लांब पल्ल्याच्या विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरिही तिकीटाचे आरक्षण करणे आणि नंतरच यावे लागत असल्याने तिकीट मिळत नसल्याचे कामगार सांगत अद्याप कामगार तबेल्यावर रुजू झाले नसल्याचेही रसूल पटेल यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तबेल्यात काम करणाऱ्या मजूर वर्गाची घेतली जातेय काळजी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या येथे काम करणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घेतली जात आहे. कामगारांना बाहेर जाता-येताना मास्क परिधान करणे, अधिकवेळ बाहेर न फिरणे तसेच बाहेरचे खाणे टाळण्याच्या सुचना दिल्या असल्याचेही रसूल पटेल यांनी सांगितले.