मुंबई -एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली, तर काही विद्यार्थ्यांची नऊ एप्रिलपासून ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचा अजब प्रकार उघडकीस आलेला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान? -युवासेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले की, उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीची नुकतीच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, डिप्लोमा उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची महाविद्यालयाकडून 9 एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण होऊन द्वितीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थिनींची ऑनलाइन तर थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होत असल्याने या विद्यार्थिनीचे नुकसान होणार आहे.