मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती इंद्राणी मुखर्जी ने स्वतःची मुलगी शीना बोरा हिची हत्या ( sheena bora case ) केल्याच्या आरोपात 2017 मध्ये पोलिसांनी तिला अटक केली होती. इंद्राणी मुखर्जी गेल्या अनेक वर्षांपासून भायखळा जेलमध्ये आहे.इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये असताना देखील आपल्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. तसेच हत्याकांडा संदर्भात विविध नवीन नवीन आरोप-प्रत्यारोप देखील पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत इंद्राणी कोणकोणत्या प्रकरणांमध्ये चर्चेत राहिलेली आहे याचा सविस्तर आढावा...
काय आहे प्रकरण -इंद्राणी मुखर्जीने एकूण तीन लग्न केली आहेत. तिचा पहिला पती हा सिद्धार्थ दास. त्रिपुरा येथील टी स्टोअर ओनर असलेला सिद्धार्थ दास हा तिचा पहिला पती होता. सिद्धार्थपासून इंद्राणीला झालेली मुलगी म्हणजे शीना बोरा. नंतर इंद्राणीने कोलकतामधील व्यापारी संजीव खन्ना याच्यासोबत दुसरे लग्न केले. इंद्राणीचे तिसरे लग्न झाले ते मीडिया टायकून पीटर मुखर्जींसोबत. या दोघांमध्ये 16 वर्षांचे अंतर होते. इंद्राणीसोबत तिची मुलगी शीना राहातो होती. इंद्राणीने यावेळी पतीसह सर्वांना शीना आपली बहिण असल्याचं सांगितले. अशातच पीटर मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितले जाते. यामुळे इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली. शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.
शीना बोरा हत्येचा खुलासा -21 ऑगस्ट 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर खार पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश कदम यांच्या टीमने इंद्राणी शिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. पोलीस चौकशीत श्यामने तो एप्रिल 2012 मध्ये एका मुलीची हत्या करण्यात सहभागी होता असा धक्कादायक खुलासा केला होता. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तिची आई इंद्राणी मुखर्जीची मदत केली होती. रायगडमध्ये मृतदेह फेकण्यात आला. यात इंद्राणी मुखर्जीचा पूर्व पती संजीव खन्नाही शामिल होता. अशी माहिती राकेश मारिया पुस्तकात देणात आलेली आहे.
श्यामला शीनाचा मृतहेद कुठे टाकण्यात आला त्याठिकाणी घेऊन जाण्यास पोलिसांनी सांगितलं. शीनाचा मृतदेह रायगडमधील गागोदे गावाजवळ एका निर्मनुष्य ठिकाणी टाकण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. शीनाचा खून झाला त्यादिवशी संजीव खन्ना कोलकात्याहून मुंबईत आला होता. इंद्राणी आणि शीना मुंबईतील वांद्रेमध्ये भेटल्या. गाडीत इंद्राणी, शिना, ड्रायव्हर श्याम राय आणि संजीव खन्ना होते. ठरल्याप्रमाणे गाडी मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजच्या गल्लीमध्ये आली. गाडीतच शीनाची गळा आवळून हत्या करण्यात आली. मृतहेद लपवण्यासाठी आणलेल्या सूटकेसमध्ये भरण्यात आला. त्यानंतर गाडी इंद्राणी मुखर्जी यांच्या वरळीतील घराच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. आणि दुसऱ्या दिवशी रायगडमध्ये मृतदेह जाळून टाकण्यात आला. पोलिसांनी शीना बोराच्या मृतदेहाचे अवषेश रायगडमधून जप्त केले होते. हे अवयव तपासणीसाठी सर. जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते. एम्सच्या फॉरेन्सिक विभागानं तयार केलेल्या या अहवालानुसार 2015 साली तपासादरम्यान सापडलेला सापळा हा शीना बोराचाच असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.
इंद्राणी मुखर्जीचे शीना बोरा हत्याप्रकरणातील वादग्रस्त वक्तव्य
मुलगी शीना जीवंत असल्याचा इंद्राणीचा दावा - शीना बोरा जीवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती. असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता. इंद्राणीने या प्रकरणात सीबीआय संचालकांना पत्र पाठवले होते. त्यांनी शीना बोरा हिचा तपास काश्मीरात करावा, असे अपीलही केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. शीना हिचा गळा दाबून हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह जमिनीत गाडल्याचा इंद्राणीवर आरोप आहे.