मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या घरातच हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa ) करायचे आहे, असा अट्टाहास राणा दांपत्याने धरला. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार यासाठी अमरावती ते मुंबई प्रवासही नकळत राणा दाम्पत्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच ( Shivsena Attacked On Rana ) आक्रमक झाले होते. राणा दांपत्य आणि शिवसैनिकांमध्ये वाद जवळपास दोन दिवस रंगला असून शेवटी राणा दाम्पत्याने केलेल्या आवाहनानंतर पोलिसांकडून ( Navneet Rana Arrest ) त्यांना अटक करण्यात आली. मात्र, राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानानंतर महाराष्ट्रात एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. विरोधक आणि सत्तेत असलेल्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नेहमीच पाहायला मिळाला. आतापर्यंत अशी वादग्रस्त वक्तव्य करून कोण कोणत्या नेत्यांनी वातावरणात तणाव निर्माण केला होता त्याबाबत घेतलेला हा सखोल आढावा.
नारायण राणे ( Narayan Rane ) -राणे कुटुंबियांकडून नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांबाबत तिखट प्रतिक्रिया केल्या जातात. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर महाराष्ट्रात त्यांचा असलेला पहिलाच दौऱ्यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावल्या याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर ही राज्यभरात तणाव पाहायला मिळाला होता. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचासाठी शेवटी केंद्रीय मंत्री असूनही राणे यांना 24 ऑगस्ट 2021 ला रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मिळाला असला तरी या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच तणाव वाढला होता.
नाना पटोले ( Nana Patole ) -20 जानेवारी 2022 ला 'आपण मोदी ला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काही स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, हे वक्तव्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलं नसून मोदी हा तेथील स्थानिक गावगुंड आहे. त्या गावगुंडाने स्थानिक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आपण असे वक्तव्य केले असल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिले होते. मात्र, नाना पटोले यांनी जाणून-बुजून हे वक्तव्य केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हे असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात ठिकाणी आंदोलनेही केली गेली.