मुंबई - प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी बेस्टकडून खासगी एसी बसेस चालवल्या जातात. या बसेसवर काम करणाऱ्या कंत्राटी चालकांना वेळेवर वेतन दिले जात नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा निर्णयही घेण्यात आलेला नाही. यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांच्या चालकांनी संप पुकारला आहे.
BEST : बेस्टच्या कंत्राटी चालकांचे पुन्हा ‘काम बंद’ आंदोलन - बेस्ट बस चालक आंदोलन
प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी बेस्टकडून खासगी एसी बसेस चालवल्या जातात. या बसेसवर काम करणाऱ्या कंत्राटी चालकांना वेळेवर वेतन दिले जात नाही. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा निर्णयही घेण्यात आलेला नाही.
काम बंद आंदोलन -दोन - अडीच महिन्यांपूर्वी वेतन थकल्याने कामगारांनी बेमुदत कामबंद आदोलन केले होते. यावेळी कामगारांचे थकलेले वेतन व पुढील वेतन नियमित मिळेल तसेच इतर समस्याही सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते. मात्र या समस्या अजूनही कायम आहे. कामगारांना वेळेत वेतन न मिळाल्याने कंत्राटी चालकांनी कामबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारपासून सुरु केलेले आंदोलन सोमवारीहही सुरुच आहे. समस्या सुटेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा कामगारांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले. रविवारीपासून मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांच्या चालकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे रविवारी वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या नियोजित ४८ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालवण्यात आलेल्या नाहीत. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टच्या २९ बसगाड्या चालवल्या. सोमवारीही वडाळा आगारातून एम्.पी. ग्रूपच्या ६३ बसगाड्या बसचालक कामावर न आल्यामुळे चालू शकल्या नाही. बेस्ट प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी २७ बसगाड्या चालवल्या.
समस्या सोडविण्याकडे दुर्लक्षच -बेस्टच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. बेस्ट उपक्रमाने नियुक्त केलेल्या सहा कंत्राटदारांनी भाडेतत्वारील बसगाड्या उपलब्ध केल्या असून, त्या विविध मार्गांवर चालवण्यात येत आहेत. भाडेतत्वावरील बसगाडीवर संबंधित कंपनीकडूनच कंत्राटी चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चालकांना वेळेवर वेतन मिळालेले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कमही त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. वडाळा आगारात एम.पी. ग्रुपतर्फे भाडेतत्वावर बसचा पुरवठा करण्यात आला असून, या कंत्राटदाराने नियुक्त केलेले कंत्राटी चालक त्या चालवत आहेत.