मुंबई -मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र महिनाभरातच ही लाट ओसरली आहे. यामुळे गेले काही दिवस झोपडपट्ट्यांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही. आता सील इमारतींची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी राहिल्याने मुंबईमधील झोपड्यानंतर इमारतीही कंटेनमेंट मुक्तीकडे वाटचाल करत आहे.
- इमारती कंटेनमेंटझोन मुक्तीकडे
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. त्यापैकी दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट थोपवण्याचे काम सुरु आहे. डिसेंबरपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६ ते ८ जानेवारीदरम्यान रोज २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत असून सध्या ८०० ते ९०० रुग्ण दिवसाला आढळून येत आहेत. तिसऱ्या लाटेदरम्यान ६ जानेवारीला ३२ झोपडपट्ट्या आणि ५०८ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून सील होत्या. १० जानेवारीला त्यात काही प्रमाणात घट होऊन ३० झोपडपट्ट्या आणि १६८ इमारती कंटेनमेंट झोन म्हणून सील होत्या. १२ जानेवारीला एकही झोपडपट्टी कंटेनमेंट झोन म्हणून सील नव्हती. त्यादिवशी ५६ इमारती सील होत्या. त्यानंतर ४ फेब्रुवारीपर्यंत एकही झोपडपट्टी कंटेनमेंट म्हणून सील करण्यात आलेली नाही. केवळ ३ इमारती सील आहेत. यामुळे झोपड्पट्टीनंतर इमारतीही कंटेनमेंट मुक्त झाल्या आहेत.
- रुग्ण दुपटीचा कालावधी वाढतोय
मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आली. १ फेब्रुवारी रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ५६४ दिवस इतका होता. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली. या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला १० ते ११ हजार रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने १ एप्रिलला रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ तर १८ एप्रिलला हा कालावधी ४५ दिवसांवर घसरून खाली आला होता. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने १ डिसेंबरला हा कालावधी २७८० दिवसांवर पोहचला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये तिसरी लाट सुरु झाल्यावर रुग्ण दुपटीचा कालावधी ११ जानेवारीला ३६ दिवसांपर्यंत घसरला होता. हा कालावधी वाढून आता ६६६ दिवस इतका झाला आहे.
- आतापर्यंत १० लाख ५० हजार रुग्णांची नोंद