मुंबई -दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा गेल्या ५६ वर्षापासून शिवसेनेची आहे. मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा षड्यंत्र भाजपचे असल्याचा आरोप शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा कोणाचा होणार यासाठीचा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातला वाद कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र न्यायालयाने देखील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला परवानगी शिवसेनेला दिली आहे. दसरा परंपरा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्याची परंपरा 1966 पासून शिवसेनेची आहे. त्यामुळे दसरा मेळावा घेण्याची परंपरा यावर्षी देखील कायम ठेवणार असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला होता. मात्र दसरा मेळाव्याचा वाद जाणून-बुजून भारतीय जनता पक्षाकडून काढला गेला. शिवसेना पक्षामध्येच फूट पाडून एकनाथ शिंदे गटाच्या मागून भारतीय जनता पक्ष हे सर्व करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय.
भाजपला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे - शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले. शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी न मिळाल्यास मुंबईसह राज्यातला शिवसैनिक आक्रमक होईल. याची कल्पना भारतीय जनता पक्षाला आहे. एकनाथ शिंदे गट आणि आणि शिवसैनिक या दोघांमध्ये वाद निर्माण होईल. त्या वादातून राज्यात आणि मुंबईत कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण होईल. असे झाल्यास राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचे षड्यंत्र भारतीय जनता पक्षाचे असल्याचा आरोप मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
दसरा मेळाव्याच्या वादाशी भाजपचा संबंध नाही - गेली वर्षानुवर्षे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा होत आहे. मात्र यावेळी उद्धव ठाकरे यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मात्र शिवसेनेच्या या फुटीत भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही भारतीय जनता पक्षासोबत आहे. राज्यामध्ये युतीचे सरकार आहे. मात्र असे असले तरी शिवसेनेमध्ये असलेल्या दोन गटाच्या वादाशी आमचा कोणताही संबंध नाही. एखाद्या मेळाव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर न्यायालयही त्याला परवानगी देत नाही. तसेच राज्यामध्ये आमचे युतीचे सरकार आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर करत असलेले आरोप चुकीचे असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी सांगितले आहे.
मेळाव्यासाठी शिंदे गटाला मुंबई भाजपचा छुपा पाठिंबा - राज्यात नाट्यमय सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यासाठी आता यंदा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा हा कोण घेणार? यावर वादविवाद सुरू असताना उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोघांनीही हा मेळावा ऐतिहासिक करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. अशात शिंदे गटानेच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यावा असा पडद्यामागील पाठिंबा भाजपने शिंदे गटाला देऊ केला आहे. विशेष करून मुंबई भाजप यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरली आहे. शिंदे गटाचा हा मेळावा अभूतपूर्व व ऐतिहासिक करण्यासाठी मुंबई भाजप कार्यकर्त्यांनीसुद्धा कंबर कसली आहे. याबाबत उघडपणे भाजप नेते बोलत नाहीत. तरी आत्ताच झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी जो जल्लोष शिवाजी मंदिरमध्ये दिसून आला ते पाहता मुंबईतील असंख्य शिवसैनिकांना आपल्याबाजूने करण्याचे प्रयत्न मुंबई भाजपतर्फे होताना दिसून येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटासाठीसुद्धा हा मेळावा अभूतपूर्व करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मुंबईतील शिवसेनेकांची मोठी गर्दी या मेळाव्याला जमा करण्यासाठी त्यांनी सुद्धा विविध स्तरावर आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने जी फूट शिवसेनेत पडली आहे, त्याबाबत शिंदे गटाविरोधात जनतेमध्ये आक्रोश निर्माण करण्याचे काम युवा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे व त्यांचे सहकारी करत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे यांचीसुद्धा तोफ धडाडणार आहे. यासाठी हा मेळावा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा आहे. जरी तो बांद्रा कुर्ला संकुलात झाला तरी शिंदे गटाच्या या मेळाव्यासाठी मुंबई भाजप पूर्ण ताकद लावणार असल्याची माहिती मिळत आहे.