मुंबई -सर्वसामान्यांना लोकलने प्रवासाची मुभा दिल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त येत आहे. हे वृत्त अत्यंत चुकीचं असून, लोकल ट्रेन बंद करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे. जेव्हा लोकल बंद होती आणि बेस्ट व एसटीच्या बसेसमधून प्रवासी गर्दी करत होते. तेव्हा कोरोना वाढत नव्हता का? असा प्रश्न महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या वंदना सोनवणे यांनी सरकारला विचारला आहे.
स्वच्छतेवर भर द्या
राज्य सरकारने आणि रेल्वे प्रशासनाने काटेकोरपणे कोविड नियमांची अंमलबजावणी करावी. तसेच रेल्वे स्थानकाच्या एक्झिट पॉईंटवर सॅनिटायझर मशीन लावण्यात यावेत, सोबतच लोकल गाड्या वारंवार निर्जंतुकीकरण केल्या पाहिजे. अनेकदा आम्ही यासंबंधी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मात्र अद्यापपर्यंत आमच्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. फक्त गाड्या तयार करण्यामध्ये रेल्वेकडून पैसे खर्च करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोपही वंदना सोनवणे यांनी केला आहे.
गर्दीचे योग्य नियोजन करावे
तब्बल दहा महिन्यानंतर सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ही मुभा देत असताना वेळेची मर्यादा सर्वसामान्यांना घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच रेल्वे स्थानकावर स्वच्छतेवर भर आणि स्वछता कर्मचारी वाढवणे आवश्यक आहे. पण हे न करता चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले.
कोरोना लोकलने प्रवास केल्यानेच होतो का? रेल्वे प्रवासी संघटनेचा सवाल स्टिकर आणि बॅनर लावून जबाबदारी झटकू नये
कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. यासह प्रवाशांनी देखील नियम पाळले पाहिजेत. रेल्वे प्रशासनाने स्टिकर चिटकवून, बॅनर लावून जबाबदारी झटकू नये. लोकलमध्ये, रेल्वे परिसरात नियमांचे पालन करून घेणे आवश्यक आहे. नियम न पाळणार्या प्रवाशांवर रेल्वेने कडक कारवाई केली पाहिजे, मात्र, कारवाई होताना दिसून येत नाही. माझी रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम न पाळणार्या रेल्वे प्रवाशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील यावेळी वंदना सोनवणे यांनी केली आहे.