मुंबई -कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासासाठी काही बंधने आजही लागू आहेत. मात्र, सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र, लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन-
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडीने प्रवास करायचा असेल त्यावेळी कोविड संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन केले आहे. त्याचवेळी लोकलमध्येही या नियमांचे पालन करण्यात यावे. लांब पल्ल्याच्या गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाला लोकल रेल्वेचे तिकीट काढावे लागणार आहे, हे तिकीट सहा तास अधिकृत असणार आहे.
'ही' मागणी रेल्वेकडून मान्य-
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करायचा असल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस ही स्थानके प्रामुख्याने गाठावी लागतात. मात्र, सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा नसल्याने बाहेरगावी जाण्यासाठी घरून निघणाऱ्या व बाहेरगावाहून मुंबईत परतणाऱ्या हजारो प्रवाशांची प्रचंड कोंडी होत होती. लोकलचा पर्याय उपलब्ध नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसून प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांनी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे १५ डिसेंबर रोजी केली होती. ही मागणी रेल्वेकडून मान्य करण्यात आली आहे.
हेही वाचा-धक्कादायक! राज्यात अंदाजे 40 हजार 'मुन्नाभाई एमबीबीएस' सक्रीय?
हेही वाचा-कोल्हापूर : दहा लाखांची लाच स्वीकारताना आयकरचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात