मुंबई -राज्यातील ९२ नगर परिषदा व ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. १२ जुलै ते ११ ऑगस्ट आणि २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांची आज ( 11 जुलै ) राज्य निवडणूक आयोग कार्यालयात भेट घेतली. या निवडणुका पुढे ढकलण्यासंबंधी त्यांना विनंती केली ( chandrakant patil on Elections commission ) आहे.
निवडणुका पुढे ढकलाव्यात? -राज्यात एकीकडे ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम असताना दुसरीकडे राज्यातील ९२ नगरपरिषदा व ४ नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आज भाजप शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेऊन त्यांना या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विनंती केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठ मंडळ यू.पी.एस. मदान यांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोग निवडणुका घेत आहे. परंतु, राज्यात सध्या पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये आहे.