मुंबई :परेल येथील जेरबाई वाडिया रुग्णालयात नुकतीच एक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. 14 दिवसांच्या सयामी, छातीपासून बेंबीपर्यंत चिकटलेल्या मुलींना विभक्त करण्यात वाडियाला यश आले आहे. 6 तासांच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर या मुलींना नवीन आयुष्य मिळाले आहे.
यकृत, आतडे जोडले होते एकमेकांशी..
या मुलींचा जन्म वाडियामध्ये 14 दिवसांपूर्वी झाला होता. मात्र या मुली छातीपासून बेंबीपर्यंत एकमेकांशी जोडलेल्या होत्या. तर या मुलींचे एकत्रित वजन जन्मावेळी ४.२ किलोग्रॅम इतके होते. त्यांचे यकृत, छातीचा भाग आणि आतडे एकमेकांशी जोडलेले होते. या सयामींना जन्मल्यानंतर लागलीच एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या सयामींना लवकरात लवकर विभक्त करणे गरजेचे होते. त्यानुसार डॉक्टरांनी त्यांच्या पालकांशी चर्चा करत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकासह मुलींचे पालक.. 6 तास चालली शस्त्रक्रिया..
या मुलींना विभक्त करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हे आव्हान फार मोठे नि अवघड होते. त्यानुसार डॉक्टरांनी सर्व गोष्टीचा बारीक विचार करत, अभ्यास करत 3 जानेवारीला शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना या मुलींचे वय 14 दिवसांचे होते. तब्बल 6 तास ही शस्त्रक्रिया सुरू होती.
शस्त्रक्रियेनंतर विभक्त झालेल्या जुळ्या मुली.. बालरोगतज्ञ, नवजात शिशूतज्ञ भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, थोरॅसिक सर्जन आणि प्लास्टीक सर्जनच्या टीमने अखेर ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार करत दोघींना वेगळे केले. दरम्यान हार्मोनिक स्कॅल्पेल आणि टी-सील'चा वापरुन यकृत कापण्याच्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर येथे करण्यात आला. ज्यामुळे रक्तस्त्राव 10 मिलीलीटरने कमी करता आला. दरम्यान या दोन्ही मुली आता सुखरूप आहेत.
आम्ही तेव्हाच घाबरून गेलो होतो..
आपण आई-बाबा होणार ही बातमी सगळ्याच जोडप्याच्या आयुष्यात सुख आणि आनंद घेऊन येते. त्यानुसार आम्हालाही खूप आनंद झाला. पण हा आनंद काही दिवसांपुरताच होता. कारण गरोदर राहिल्या नंतर काही दिवसांतच मला प्रेग्नेंसीमध्ये काही गुंतागुंत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि मग एकच भीती मनात निर्माण झाली. पण डॉक्टरांनी आमच्या मुलांवर शस्त्रक्रिया करता येईल आणि तीही सामान्य आयुष्य जगतील असा विश्वास दिला. पण तरीही भीती मनात होती आणि आता मात्र शस्त्रक्रिये नंतर ही भीती दूर झाली आहे, अशी प्रतिक्रिया या मुलीच्या पालकांनी दिली आहे.
हेही वाचा :बलांगीरचा 'वंडरबॉय' : सात वर्षांचा कोडिंग तज्ज्ञ; बनवलेत १५०हून अधिक अॅप्स..