मुंबई- नाना पटोले यांच्या विविध वक्तव्यांवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पटोले यांच्या वक्तव्यांवरून स्पष्टपणे नाराजीही व्यक्त केली आहे. हा वाद चालू असताना नाना पटोले यांनी आता काँग्रेसला राज्यातील एक नंबरचा पक्ष बनवण्याचा निर्धार केला आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसमोर ठेवून काँग्रेस पक्षाला राज्यात एक क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तसेच आघाडीबाबतचा निर्णय त्यांनी वरिष्ठांवर सोपवला आहे.
प्रत्येक पक्षाला वाटतं की, त्याचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवा. तेच काँग्रेस पक्षाला ही वाटते. म्हणून 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकां समोर ठेवून काँग्रेस पक्षाला राज्यात एक क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. तसेच आघाडी करायची किंवा नाही याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वेळ आल्यावर निर्णय घेतील हे देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पटोले यांना आपल्या स्वबळाच्या नाऱ्याची धार कमी करावी लागली असल्याचेही त्यांच्या या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं?
नाना पटोले यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर शरद पवार नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मंगळवारी (13 जुलै)काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी देखील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित नव्हते. या परिस्थितीत नाना पटोले यांच्या स्वबळाचा नाऱ्यावर शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते? काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर, तसं नेत्यांनी स्पष्ट करावे असे बैठकीत शरद पवार म्हणाले. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं? हे सर्वांना माहीत आहे, असा चिमटा नाना पटोले यांच्याकडून काढण्यात आलाय. त्यामुळे नाना पटोले यांच्या स्वबळाचा नाऱ्यामुळे पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी होणार का याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
मला जे म्हणायचे आहे तेच 'सामना' मध्ये
आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार सर्वांना आहे. हेच आज सामनाच्या अग्रलेखामध्ये आलं आहे. आपला पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेच मी माझ्या पक्षाबद्दल करतोय, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांच्याकडून सामनाच्या अग्रलेखात बाबत देण्यात आले.
आघाडीत कोणताही वाद नाही- बाळासाहेब थोरात
शरद पवार हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळेच मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही यांची सदिच्छा भेट घेतली. आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. नाना पटोले यांच्या संबंधीची चर्चा आता संपली आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे. बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्या बाबत चर्चा केली होती.
काय होती 2014 ची स्थिती-
काँग्रेस स्वबळावर लढणार हा नारा देणाऱ्या नाना पटोलेंनी आज 2014च्या निवडणुकीची आठवण करून दिली. मंगळवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी काँग्रेसला स्वबळावर लढायचा आहे का, याबाबतचे स्पष्टीकरण विचारले होते. त्यावर बोलताना आज पटोले यांनी 2014 च्या निवडणुकीचा दाखला देत चिमटा काढला होता. त्या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२३ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना ६३, काँग्रेस ४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१, मनसे १ आणि इतर पक्षांना १८ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राज्यात ६४ टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने एकमेंकावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मात्र, मोदी लाटेचा परिणाम एवढा मोठा झाला की, ज्या भाजपला २००९ च्या विधानसभेला ४६ जागा मिळाल्या होत्या, त्यामध्ये दुपटीहून अधिक वाढ होऊन १२३ जागा मिळाल्या मात्र, स्पष्ट बहुमताचा कौल राज्याने दिला नाही. त्यामुळे ज्या शिवसेनेवर टीका करत त्यांना संपवण्याची भाषा करणाऱ्या भाजपने त्यांनाच सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली पाच वर्षे सरकार चालवले. निकालानंतर शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करून शिवसेनेची कोंडी केली होती. त्यामुळे शिवसेनेची आक्रमकता आपोआपच कमी झाली होती.
पटोलेंवर घुमजाव करण्याची वेळ-
मागील काही दिवसापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. माझ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाळत ठेवत असल्याचे वक्तव्य करत पटोले यांनी खळबळजनक उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत वादंग निर्माण होत असल्याचे चित्र असल्याने कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पटोले यांच्यावर घुमजाव करण्याची पाळी आली आहे. पटोलेंनी स्वबळाच्या नाऱ्याला आता वरिष्ठ निर्णय घेतील असा पवित्रा घेतला आहे.