मुंबई -पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत असताना पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याविरोधातच काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. २३ फेब्रुवारीला होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्र काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यभर केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपवर जनतेचा विश्वास राहिला नसून, नुकत्याच पंजाबमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात काँग्रेसवर लोकांनी विश्वास ठेवला नसल्याचेही पटोले म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंधन दरवाढीविरोधात सेलिब्रिटी ट्विट का करत नाही?
देशात काँग्रेसचे सरकार असताना इंधन दरवाढीच्या विरोधात सेलिब्रिटी ट्विट करत होते. मात्र आता पेट्रोल शंभरी पार होण्याची स्थिती आली आहे. तरीदेखील महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार अक्षय कुमार हे ट्विट का करत नाहीत. त्यांच्या हाताला नेमकं काय झालंय? असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे. काँग्रेस सरकार असताना खरी लोकशाही होती, सेलिब्रिटींना त्यांचे मत मांडता येत होती. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही, असं म्हणत भाजप लोकशाहीला मारक आहे, असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं
राज्यपाल यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईला तयार-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे संविधानिक पदावर असून देखील भाजपचा अजेंडा रेटण्याचं काम ते करत असल्याचा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केला. महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांमध्ये राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहेत. खासकरून 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पत्रावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी विचार करत असून, त्या संबंधीची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
संजय राठोड प्रकरणात पोलिसांवर सरकारचा दबाव नाही
भाजप 24 फेब्रुवारीपासून राज्यभर वीज बिलासंदर्भात आंदोलन करणार आहे. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी नेमकं काय केलं. हे आम्ही अधिवेशनात सर्वांच्या समोर आणू, तसेच संजय राठोड प्रकरणात पोलिसांवर सरकारचा कोणताही दबाव नाही. याउलट भीमा कोरेगाव प्रकरण आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे इतर तपास यंत्रणांना देऊन देवेंद्र फडणवीस यांना काय साध्य करायचं होतं? असा उलट सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा -#MeToo : मानहानी प्रकरणात प्रिया रमाणी यांची निर्दोष सुटका
हेही वाचा -पंजाबमध्ये काँग्रेस 'बल्ले-बल्ले' तर भाजपाला धक्का, वाचा कोणी कुठे मारली बाजी