मुंबई -सध्या राज्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना सत्तेत आहेत. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिकेमध्ये त्यांची आघाडी कायम राहणार का? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा जन्म झाला. कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावर काम करण्याचा निर्णय घेऊन हे तीन पक्ष सत्तेत आले. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ही आघाडी कायम राहणार का याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
राज्यात सत्तेवर येताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करतोय. तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत देखील काँग्रेस महाविकास आघाडीसोबत असेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. मात्र त्यासोबतच महापालिका निवडणुकीचा निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस हा आघाडीचा घटकपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे.