मुंबई- राज्यात सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. त्यातच सत्तेत असलेल्या महाविका आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला ठणकावून विरोध केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराच्या विषयावरून थेट माहिती व महासंचानलायाच धारेवर धरले आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर राज्यातील अनेक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मराठा समाजाच्या संघटनांकडून थोरात यांच्या विरोधात आंदोलनेही केली आहेत. मात्र, तरीही काँग्रेस शहरांच्या नामांतराविरोधात ठाम आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरास आमचा ठाम विरोध आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला खडे बोल-
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. अशा शब्दात महसूल मंत्री थोरात यांनी माहिती व जनसंपर्क महासंचानलयासही खडे बोल सुनावले आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाची जाहिरात करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे. त्यावरून थोरातांनी प्रतिक्रिया देत शहरांच्या नामातराला काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे ठणकावून सांगितले आहे.