मुंबई -देशभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसने निवडणुकीकडे लक्ष दिलं नाही. देशाच्या जनतेची सुरक्षा हेच आमचे ध्येय आहे, मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार बेजबादार पद्धतीने वागले, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
देशभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. देशातील जनता सुरक्षीत राहावी हे एकच ध्येय काँग्रेससमोर असून, काँग्रेसने निवडणुकीचा प्रचार सर्वात आधी बंद केला. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांना निवडणुकीची चिंता आहे, त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही भाजपाने प्रचार सुरूच ठेवा होता, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
'भाजपाने कोरोना पसरवण्याचे काम केले'
पश्चिम बंगालच्या महिला मुख्यमंत्र्यांना हरवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री यांनी जंग जंग पछाडले. भाजपाचे सगळे नेते पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून बसले होते. मात्र त्यांना ममता बॅनर्जींचा पराभव करणं जमलं नाही. उलट कोरोना पसरवण्याचे काम केंद्र सरकारने केलं, असा टोला नाना पटोले यांनी भाजपाला लगावला आहे. याच निवडणुका दोन ते तीन महिन्यानंतर घेण्यात आल्या असत्या, तर भाजपाला आता मिळालं तेवढं देखील यश मिळालं नसतं, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. संपूर्ण ताकद पणाला लावून भाजपाला यश मिळवता आलं नाही, कारण भाजपचा खरा चेहरा जनतेला समजला असून, जनतेनेच पंतप्रधानांची हवा काढली असंही नाना पटोले यांनी म्हटले आहे.