मुंबई -राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत. भाजपाप्रणीत नवीन सरकारने तत्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केली आहे. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण ( Political reservation of OBC ) घालवण्यात तत्कालीन फडणवीस सरकार व केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही नाना पटोलेंनी केला आहे.
'केंद्र सरकारने जाणीवपूर्वक राज्य सरकारची अडवणुक केली' :फडणवीस सरकारने सत्तेत असताना ओबीसींचे गेलेले आरक्षण पुनर्स्थापित व्हावे यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि आरक्षणाची गुंतागुंत वाढली. कोर्टाने इंम्पेरिकल डाटा मागितला, परंतु केंद्र सरकारने हा डाटा देण्यास नकार दिला. केंद्रातील भाजपा सरकारने जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारची अडवणूक केली. यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष सुरूवातीपासून ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये, याच भूमिकेचा आहे व आजही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये, हीच भूमिका कायम असल्याचेही नाना पटोलेंनी सांगितले आहे.