मुंबई - भाजप सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त करणाऱ्या अभिनेता किरण माने यांच्या समर्थनार्थ काँग्रेस मैदानात ( congress support Actor Kiran Mane ) उतरली आहे. भाजपविरोधात मत व्यक्त केल्याने ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून ( Actor Kiran Mane in Mulagi Zali ho ) काढण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( congress demands apology from star pravah ) यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, की अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. संविधानाने त्यांना विचार मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा सवालही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते लोंढे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा-झुंडशाहीला धक्का देणार, माझ्या भूमिकेत फरक नाही: अभिनेता किरण माने
काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार ( Atul Londhe over constitutional rights ) आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.