मुंबई - राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. क्रूझ ड्रग्स प्रकरणातील साक्षीदाराने केलेल्या खुलासामुळे महाराष्ट्र द्रोहींचा चेहरा उघडा पडला, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. हे प्रकरण गंभीर आहे, महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या यंत्रणांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे
'दोषींवर कारवाई करा'
क्रूझवरील ड्रग्स कारवाईच्या माध्यमातून नवनवीन खुलासे समोर येत आहेत. साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या कारवाई विरोधातील धक्कादायक खुलासे केले होते. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांनी एनसीबीच्या कारवाईचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर आता कॉंग्रेस पक्षाने भूमिका जाहीर केली आहे. प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञा पत्र देताना, व्हिडिओ दिले आहेत. कारवाईचा सविस्तर सारांश सांगितला आहे. सीसीटीव्ही माध्यमातून या प्रकरणाचे पुरावे मिळू शकतात. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना नमवण्यासाठी करतात. महाराष्ट्रालाही बदनाम केले. अधिकारी वर्ग सुध्दा त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्र सरकारने आपल्या यंत्रणा, पोलिसांद्वारे चौकशी करावी. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
हेही वाचा -आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरून आरोप