मुंबई - महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना रणौतला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो. त्यामुळे राज्यपालांवर दबाव होता का? हा संदेह जनतेत आहे. राज्यपालांनी अभिनेत्री कंगनाची कानउघाडणी केली असती तर महाराष्ट्राच्या जनतेला आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.
हेही वाचा -'या' ऑडिओ क्लिपमुळे कोरोनातील गोरखधंदा उघड
सावंत पुढे म्हणाले की, राज्यपाल उत्तराखंडचे असले तरी आता ते सर्वस्वी महाराष्ट्राचे आहेत. तसेच ते संविधानाच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहेत. सर्वांनाच त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यातही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा रक्षणाची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपालांची असते. मुंबई, महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या कंगनाला राज्यपालांनी चार शब्द सुनवायला हवे होते, असे सावंत म्हणाले.
हेही वाचा -पाच महिन्यांत 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू, मंत्रालय कोरोना हॉटस्पॉट बनण्याची भीती
कसलेच ताळतंत्र नसलेल्या तसेच भाजपच्या इशाऱ्यावर बोलणाऱ्या कंगनाने राज्यपालांचाही अवमानच केला आहे. राज्यपालांच्या भेटीवेळी महामहीम आसनस्थ होण्याआधीच कंगना खाली बसली. त्यामुळे तिने आमच्या राज्यपालांचाही आदर राखला नाही याची खदखद आमच्या मनात व जनमानसात आहे, असेही सावंत म्हणाले.