मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारने आता किमान समान कार्यक्रम राबवावा अशी मागणी केली आहे. वास्तविक काँग्रेसला मिळणारा निधी आणि काँग्रेसकडे होणारे दुर्लक्ष हे यामागे कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Congress state president Nana Patole ) आज पुन्हा एकदा राज्य सरकारने आता किमान समान कार्यक्रम ( minimum common program ) राबवावा, अशी भूमिका जाहीरपणे मांडली. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून याबाबत ( Nana Patole letter to Uddhav Thackeray ) मागणी केली होती. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारने काम सुरू करावे. कोरोना संपला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घटक पक्षांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे.
लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचा आटापिटा - देशपांडे
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस सातत्याने आपण नाराज असल्याचे सांगत आहे. आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत काँग्रेसने अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा घटक पक्षांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अथवा सरकारवरील आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी किमान समान कार्यक्रम राबवण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने नाना पटोले करीत आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे. या बाबीवरून लक्ष ठेवण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पद्मभूषण देशपांडे यांनी सांगितले आहे.
सरकारला किमान समान कार्यक्रम आहे का - भावसार
राज्य सरकार गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना संकटात अडकून आहे. त्यांना किमान समान कार्यक्रमावर काम करता आले नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, या सरकारने काही किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. तो खरेच सरकार अंमलबजावणी करणार आहे का, त्यादृष्टीने सरकार पावले उचलणार आहे का असा सवाल ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी उपस्थित केला आहे.