महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सारथी' वरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वादाला फोडणी - छत्रपती संभाजीराजे बातमी

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यानेच मला टार्गेट केल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीकेची तोफ डागली.

sachin sawant
सचिन सावंत

By

Published : Jul 6, 2020, 9:13 PM IST

Updated : Jul 7, 2020, 10:21 AM IST

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठा, कुणबी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेल्या ‘सारथी’ संस्थेवरुन पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षाच्या वादाला फोडणी मिळाली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मंत्री वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यानेच मला टार्गेट केल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्यावतीने सचिन सावंत यांनी, टार्गेट करण्यामागे भाजपचे गलिच्छ राजकारण आहे. तसेच मराठा समाजाची सरकार विरोधात दिशाभूल करण्यासाठी हे केले जात आहे. हा डाव आम्ही मोडून काढू, असे म्हणत वादाला ठिणगी दिली आहे.

राजेंद्र कोंढरे - समन्वयक, मराठा मोर्चा

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करु नये”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. त्याचबरोबर “शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांचे हे वर्तन शोभणारे नाही”, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे.

शिवसह्याद्री चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी गेल्या दहा महिन्यापासून सारथी संस्थेची हेळसांड मंत्री वडेट्टीवार आणि सचिव गुप्ता यांच्या संगनमताने सुरू आहे, असा आरोप केला. सारथी संस्थेच्या 72 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. तारादूतसारखा चांगला प्रकल्प बंद केला. विद्यार्थ्यांचे स्टायपेंड देखील देण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच आम्ही राज्य सरकारकडे मंत्री वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते सरकारला शक्य नसल्यास बहुजन विकास विभागाकडे असलेले सारथी आणि मराठा आरक्षणाचा विषय इतर मंत्र्यांकडे द्यावेत, अशी देखील मागणी मराठा मोर्चाने केली आहे, असे कोंढरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर वडेट्टीवार यांनी “मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे”, अशी प्रतिक्रिया दिली. “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा कुणीही प्रयत्न करु नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या सारथी संस्थेला आणि त्याआडून मराठा समाजाला अशा पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही”, अशी टीका छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाने विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, “सारथी संस्था बंद पडणार नाही हे मी आजही छातीठोकपणे सांगतो. पण यामागे राजकीय मंडळी या मंडळींना चिथावणी देत आहेत, त्यांची नावं योग्यवेळी जाहीर करेन”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. “मी सारथीसाठी प्रामाणिक काम करतोय. मी ओबीसी समाजातून आलेलो आहे म्हणून सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे असं वाटत असल्याने, मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे”, असं वडेट्टीवार म्हणाले होते. “मी प्रामाणिकपणे काम करतोय. पण तरीही तुमचे आरोप झाल्यानंतर मला त्यामध्ये काम करण्यात रस नाही. आमच्या सरकारला केवळ ६ महिने झाले आहेत. मात्र चार महिन्यांपेक्षा जास्त काळ कोरोनामध्ये गेले. सर्वांना माहिती आहे की आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निधीचा तुटवडा आहे. पण हा निधी मागे-पुढे होईल, मात्र सारथी बंद पाडणार नाही. सारथीसाठी थोडासा वेळ लागणार आहे. सर्व बंद असताना केवळ एकच सारथीची भूमिका लावून धरणं योग्य नाही”, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं होतं.

मराठी क्रांती मोर्चाने सारथी संस्थेवरुन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सारथी संस्थेची स्वायत्तता धोक्यात आणली असून, वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली. पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन मराठा क्रांती मोर्चाने वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. काँग्रेसचा विचार हा सर्व समाजांना बरोबर घेऊन जाणारा आहे. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक नेता त्याच विचारांचा आहे. भाजप हा समाजामध्ये द्वेष पसरविणारा आकस व संकुचित विचारांचा पक्ष आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांना टार्गेट करण्यामागे भाजपचे गलिच्छ राजकारण आहे. मराठा समाजाची सरकार विरोधात दिशाभूल करण्याकरिता हे केलं जात आहे. सारथी संस्था बंद होण्याच्या वावड्या आहेत. वडेट्टीवार सारथी अधिक मजबूत करतील यात शंका नाही. भाजपच्या काळात ५० पेक्षा अधिक जण हुतात्मा झाले हे आम्ही विसरलो नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. एकंदरीतच सारथीच्या निमित्ताने भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचे राजकारण निर्माण करण्याचा प्रयत्न हा मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वादाची ठिणगी ठरला आहे.

Last Updated : Jul 7, 2020, 10:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details