मुंबई - मोदीजी, आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली?’ या कॅम्पेनवरुन देशाच्या राजकारणात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार लढाई सुरु आहे. मुंबई काँग्रेसने भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. आज वडाळा, घाटकोपर, कांजूरमार्ग या भागात काँग्रेसतर्फे मानवी साखळीचे आयोजन करून आमच्या मुलांची लस विदेशात का पाठवली असा प्रश्न भाजप सरकारला विचारण्यात आला आहे.
काँग्रेसचे भाजप सरकारविरोधात आंदोलन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आंदोलनाची घोषणा केली होती. काँग्रसचे कार्यकर्ते दरदिवशी मुंबईत 36 विधानसभा क्षेत्रात मार्केट किंवा लसीकरणाच्या ठिकाणी मानवी साखळी करून लस विदेशात का पाठवली?’ हा प्रश्न केंद्र सरकराला विचारत आहेत. प्रत्येक दिवशी सर्व विधानसभा क्षेत्रात हे आंदोलन सुरू राहणार आहे. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आज कांजुर मार्ग, वडाळा, घाटकोपर या ठिकाणी मानवी साखळी करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला.
काँग्रेसचे भाजपविरोधात आंदोलन 'मोदीजी हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यू भेजी गई?' असा प्रश्न विचारणारे फलक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांच्या हातात या आंदोलनादरम्यान होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी तयार करण्यात आलेल्या लसी 93 देशांना विकल्या. त्या लसी विदेशात विकल्या नसत्या तर आज देशातील नागरिकांना आणि तरुणांना लसीपासून वंचित राहावे लागले नसते, असा थेट आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देखील याच मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसकडून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची आंदोलन केली जात असून, केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.