मुंबई -रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि दोन आमदारांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. आठवडा उलटून गेला तरी राज्य सरकारकडून अद्याप एसआयटी नेमण्यात आलेली नाही, असा घरचा आहेर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगतापांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
राज्यातील जनतेचे मोफत लसीकरण, घरेलू कामगार, रिक्षा चालक, फेरिवाल्यांना लॉकडाऊन काळात सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीबाबत अभिनंदन करतानाच आघाडी सरकारचा जगताप यांनी समाचार घेतला. नियमबाह्य पध्दतीने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात केल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. फडणवीस, दरेकर यांनी यानंतर पोलीस ठाणे गाठून सरकारी कामांत हस्तक्षेप केला. काँग्रेसकडून या प्रकरणी फडणवीस, दरेकर आणि इतर दोन आमदारांविरोधात गुन्हा दाखल करुन एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी पत्राद्वारे मागणी केली. मात्र, अद्याप आठ दिवस उलटून गेले तरी एसआयटीमार्फत चौकशी केलेली नाही. परमबीरसिंह यांच्या पत्रावरुन सचिन वाझेची चौकशी होते. मात्र, माझ्या पत्रावरुन फडणवीस, दरेकर यांची चौकशी का होत नाही, अशी खंत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
मोफत लसीकरण -
राज्य सरकार सुमारे दीड कोटी जनतेचे मोफत लसीकरण करणार आहे. मोफत लसीकरणाटी मागणी काँग्रेसने केली होती. १ मे पासून काही ठिकाणी लसीकरणाची प्रक्रिया सुरु होईल. ही लवकर पूर्ण व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात सेंटर तयार करावेत. मुंबईत १३८ लसीकरण केंद्र आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ते अपूरे असून २२७ वॉर्डातील प्रत्येक प्रभागांत किमान दोन सेंटर सुरु करावेत, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात कठोर लॉकडाऊन लावण्याच्या न्यायलयाच्या सूचना आहेत. सरकारने त्यानुसार निर्णय घ्यावा, काँग्रेस सरकारच्या सोबत असेल, असेही जगताप म्हणाले.