महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काँग्रेसची आज बैठक; राधाकृष्ण विखे पाटलांचा होणार 'फैसला' ? - काँग्रेस

मुंबईतील टिळकभवन येथे काँग्रेसची बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरील कारवाईचा मुद्दा चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : May 10, 2019, 8:39 AM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर काँग्रेसची आज मुंबईतील टिळकभवन येथे बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांवरील कारवाईचा मुद्दा चर्चिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुंबईसह राज्यातील सर्व मतदार संघात झालेल्या मतदानाचा आणि कामकाजाचाही आढावा घेतला जाणार असून दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याची रणनीतीही ठरवली जाणार आहे.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक फटका आपल्या पक्षातून बाहेर जाणाऱ्या नेत्यांचा बसला. त्यात प्रामुख्याने तत्कालिन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला त्याची बरीच किंमत निवडणुकीदरम्यान मोजावी लागली. विखे-पाटील हे विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी आपला मुलाचा प्रचार वगळता राज्यात कुठेही काँग्रेसला मदत होईल, असे काम केले नाही. परिणामी त्याचा सर्वाधिक भार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांवर पडला. त्याच दरम्यान, काँग्रेसने मुंबईत ऐन निवडणुकीच्या काळातच मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरूपम यांना बाजुला सारून त्या ठिकाणी माजी खासदार मिलिंद देवरा यांच्याकडे सुत्रे दिल्याने मुंबईतही काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी आणि नाराजी समोर आली. मिलिंद देवरा यांनी मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील आपल्या उमदेवारांसाठी योग्य नियोजन करता आले नाही. यामुळे मुंबईत काँग्रेसच्या बाजूने वातावरण असतानाही त्याचा लाभ काँग्रेसला घेता आला नाही. तीच गत राज्यातील अनेक मतदार संघात झाल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांच्या सभा होऊ शकल्या नाहीत, तर बहुसंख्य कार्यकर्त्यांनीही पाठ दाखवल्याने काँग्रेसला याचा फटका बसला. त्याविषयी या बैठकीत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


विशेष म्हणजे काँग्रेस विखे-पाटील यांच्यावर काय कारवाई करेल, हाच मुद्दा उद्याच्या बैठकीत सर्वाधिक गाजणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन कोकणात स्वाभिमान पक्षाचा प्रचार केला. त्यांच्याविषयीही यात निर्णय होईल, अथवा प्रदेशाध्यक्ष केंद्राकडे बोट दाखवतील, हेही या बैठकीत स्पष्ट होणार आहे. आपल्या चिरंजीवाला भाजपच्या तिकीटावर अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविणारे विखे-पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत कोणी आमदार, नेते जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details