मुंबई -राज्यपालांनी संख्याबळाच्या आधारे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावले आहे, त्याचे संजय राऊत यांनी स्वागत केले. मात्र शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसबाबतही एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. भांडुप येथील पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.
काँग्रेस पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, यावर शिवसेनेचे भूमिका काय? असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, त्यांनी काँग्रेस पक्ष हा काही महाराष्ट्राचा दुश्मन आहे का? असा सवाल केला. तसेच काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादांमध्ये चांगली भूमिका घेतली होती, असा उल्लेखही त्यांनी यावेळी बोलताना केला. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदाच्या वादामुळे सत्तेचा पेच अद्यापही कायम आहे. शनिवारी राज्यपालांनी भाजपला मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी बोलवले आहे. भाजपने 11 तारखेला रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचा निर्णय सांगायचा आहे.
हेही वाचा...'वर्षा'वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक; सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?
महाराष्ट्रात मोठ्या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करायचा असतो. राज्यपालांच्या भुमिकेचे आम्ही स्वागत करतो. भाजपकडे बहुमत असेल, यामुळेच त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यांच्याकडे बहुमत नसेल असे आम्हाला वाटत नाही, असे राऊत यावेळी म्हणाले. तसेच राज्यातील आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात येत आहे का? यावर बोलताना संजय राऊत यांनी 'आमचा नेता हा कोणताही व्यापारी नसून शिवसेनेने कधीही राजकारणात व्यवहार केलेला नाही, असे म्हटले आहे.