मुंबई -श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये ८२ हजार कोटींच्या ठेवी आहेत. मात्र या बँकांमधील ठेवी आभासी आहेत. प्रत्यक्षात पालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे. नागरी कामाच्या अनेक फाईल निधी अभावी तशाच पडून असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या बँकांमधील कोट्यावधींच्या ठेवी हा नेहमीच चर्चेचा विषय झाला आहे. महापालिकेने आपल्या बँकांमधील ठेवीबाबत नुकताच एक अहवाल स्थायी समितीला सादर केला आहे. या अहवालानुसार ऑगस्ट २०२१ मध्ये पालिकेच्या ठेवीचा आकडा ८२ हजार ४१० कोटीवर गेला आहे. यावर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा म्हणाले, की यंदा ९ हजार कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. पण पालिकेने ५ हजार कोटीचा वापर इतर कामासाठी केला. त्यामुळे यंदा प्रत्यक्षात ३ हजार कोटी रुपयेच ठेवीत जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा पालिकेच्या मुदत ठेवीची रक्कम वाढली नसल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.
मुंबई पालिकेच्या तिजोरीत खडखडाट हेही वाचा-मुंबई : नगरसेवक फुटण्याच्या भीतीनेच भाजपाकडून शिवसेनेवर बेछूट आरोप - स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव
पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक -
मुंबई पालिका ८२ हजार कोटींच्या ठेवी असल्याचा दावा करत आहेत. पण प्रत्यक्षात यातील ५० हजारांच्या ठेवी या कर्मचारी निधी आणि मोठ्या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे फक्त ३० हजार कोटी रुपये पालिका वापरू शकते. पालिकेने यंदा ठेवीतील ५ हजार कोटी रुपये हे कोरोना काळात वापरले आहेत. त्याचा हिशोब दिला पाहिजे. गेल्या दोन वर्षात पालिकेने उत्पन्नाचे स्रोत न वाढवल्याने पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनत चालली आहे, असे रवी राजा यांनी सांगितले.
हेही वाचा-महापालिका सफाई कामगारांच्या घरांमध्ये १८४४ कोटी रुपयांचा घोटाळा - भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे
राखीव निधी, कोरोनावर खर्च -
मुंबई महापालिकेकडून यंदा ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी होत्या. मात्र, ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या ठेवींमध्ये तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली हा आकडा आता ८२,४१०.४४ कोटी रुपयांवर गेला आहे. पालिकेच्या या मुदत ठेवींमध्ये कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, इतर विशेष निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांची ठेव रक्कम यांचा समावेश आहे. पालिकेने मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी नवीन पाणी प्रकल्प योजिले आहेत. त्यासाठी, कोस्टल रोड, मिठी नदी यांसारखे विकासकामे आदींसाठी पालिकेने काही प्रमाणात निधी राखून ठेवला आहे. त्या निधीचा वापर भविष्यातील प्रस्तावित प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून जीवघेण्या कोरोनाचे वातावरण आहे. कोरोनाची पहिली व दुसरी लाट परतावून आतापर्यंत कोरोनावरील वैद्यकीय उपाययोजना व अन्य कामांसाठी पालिकेच्या तिजोरीमधून अंदाजे ५ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे.
हेही वाचा-तेव्हा या कांचन माँ कुठे होत्या ?, नवं हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल - किशोरी पेडणेकर
३ हजार ३१८ कोटींचे व्याज -
पालिकेला विविध बँकातील व्याजापोटी ३ हजार ३१८ कोटींचे व्याज प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालिकेची विविध बँकातील मुदत ठेवींची रक्कम ८२ हजार ४१० कोटी ४४ लाख रुपयांवर गेली आहे. पालिकेने गेल्या ऑगस्ट महिन्यात विविध बँकात एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी किमान २ कोटी ते ५३१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची गुंतवणूक केली आहे. मुंबई महापालिकेने एकूण ९०७१.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यापोटी पालिकेला पुढील दोन वर्षात ४२८.३१ कोटी रुपयांचे व्याज मिळणे अपेक्षित आहे.
हेही वाचा-भाजपचे १५ ते २० नगरसेवक आमच्या संपर्कात, डिसेंबरमध्ये धमाका करू - शिवसेना नेते यशवंत जाधव
दरम्यान, महापालिका सफाई कामगारांच्या घरामध्ये 1,884 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. तर स्थायी समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी भाजपचे 15 ते 20 नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगत डिसेंबरमध्ये धमाका करू, असा इशारा दिला आहे.