मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचनेनुसार आरक्षण लॉटरी काढण्यात आली. या आरक्षण लॉटरीवर सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या. मात्र हरकतींवर कोणत्याही प्रकारची सुनावणी पालिका आयुक्तांकडून घेण्यात आलेली नाही. यावर काँग्रेसने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर सूचना आणि हरकतींचा विचार करून अहवाल तयार केला जाईल. पालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर अधिकृत राजपत्रात अहवाल प्रसिद्ध केला जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
२३२ हरकती -मुंबई महापालिकेचे २२७ प्रभाग होते. त्यात ९ ने वाढ करून २३६ प्रभाग राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर, मुंबई महापालिकेने ३१ मे रोजी प्रभाग आरक्षण सोडत काढली होती. त्यामध्ये १५ प्रभाग अनुसूचित जाती, २ प्रभाग अनुसूचित जमाती आणि ११८ प्रभाग महिला उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. अनुसूचित जातीच्या १५ पैकी ८ प्रभाग महिलांसाठी तर अनुसूचित जमातीच्या २ प्रभागांपैकी १ प्रभाग महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. या प्रभाग आरक्षणा विरोधात पालिकेकडे २३२ सूचना व हरकती प्राप्त झाल्या आहेत.