मुंबई -राज्यात शिवसेना, राष्ट्र्रवादी, काँग्रेस आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. राज्यात महाविकास आघाडी असताना मुंबई महानगरपालिकेत मात्र आघाडी होण्याआधीच बिघाडी झाली आहे. पालिकेतील कनिष्ठा अभियंत्यांच्या भरतीबाबत स्थायी समितीचा अवमान करणाऱ्या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा विरोध असतानाही मंजूर करण्यात आला. प्रस्तावावर बोलू दिले नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने सभात्याग केला.
हेही वाचा... लेकीला लक्ष्मी मानणाऱ्या 'त्या' पित्याने जिंकले अशोक चव्हाणांचे मन.. फोन करून केली विचारपूस !
मुंबई महापालिकेकडून 341 कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी राज्यात आचारसंहिता सुरु असताना अर्ज मागवण्यात आले. आचारसंहिता काळात पालिकेचे अनेक कर्मचारी निवडणूक कामावर असल्याने त्यांना अर्ज करता आले नाही. याचे पडसाद स्थायी समितीत उमटले होते. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत परिक्षा घेऊ नका असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले होते. त्यानंतरही प्रशासनाने ही परीक्षा घेतली. याचे पडसाद पालिका सभागृहात उमटले. सर्व पक्षीय गटनेते आणि नगरसेवकांनी आज बुधवारी पुन्हा प्रशासनाला धारेवर धरले. 341 पदांसाठी 36 हजार 218 उमेदवारांनी अर्ज आले. त्यासाठी दिड कोटी रुपयांचा खर्चही झाला. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.