मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जागा वाटप फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानुसार विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस 125, राष्ट्रवादी 125 जागा लढवणार आहे. या नव्या सुत्रानुसार आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादीची सरशी झाल्याचे दिसत आहे.
हेही वाचा... विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार
आघाडीचा संक्षिप्त इतिहास...
1999 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नव्याने स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे वेगवेगळे लढले होते. यावेळी काँग्रेसला 75, शिवसेनेला 69, भाजपला 56 तर राष्ट्रवादीला 58 जागा मिळाल्या होत्या. युतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर एकत्र येऊन मित्र पक्षांच्या मदतीने आघाडी सरकार स्थापन केले होते. तेव्हापासून राज्यात खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या राजकारणाची सुरुवात झाली.
2004 ची विधानसभा निवडणूक आणि आघाडी
2004 ची विधानसभा निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी यांनी एकत्र लढवली होती, यावेळी झालेले जागावाटप हे पुढील प्रमाणे होते...
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 157 उमेदवार
- राष्ट्रवादी काँग्रेस - 124 उमेदवार
विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसने 157 लढवल्यानंतरीही त्यांचे 69 आमदार निवडून आले होते, तर 124 जागांपैकी राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले होते. म्हणजे 2 आमदार राष्ट्रवादीचे जास्त होते. असे असतानाही राष्ट्रवादीने त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा हट्ट धरला नव्हता. कारण जरी काँग्रेसचे संख्याबळ कमी होते तरी राज्यात काँग्रेसचा जनाधार अधिक होता.
हेही वाचा... धुळे विधानसभा आढावा : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे राखणार का गड?
2009 ची विधानसभा निवडणूक आणि आघाडी
2004 प्रमाणे 2009 ची विधानसभा निवडणूकही काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र लढवली होती. यावेळी झालेले जागावाटप हे पुढील प्रमाणे होते;
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 170 उमेदवार
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - 113 उमेदवार
या निवडणुकीत आघाडीला भरघोस यश मिळाले, विशेष म्हणजे काँग्रेसने आपले राज्यातील स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले. काँग्रेसने लढवलेल्या 170 जागांपैकी काँग्रेसचे 82 आमदार निवडून आले, तर राष्ट्रवादीने लढवलेल्या 113 पैकी राष्ट्रवादीचे 62 आमदार निवडून आले होते. यावेळी आघाडीतील काँग्रेसचे स्थान हे वरचे होते, असे असले तरिही राष्ट्रवादीनेही 62 आमदार निवडून आणत, राज्यातील राजकारणावर आपली पकड भक्कम केली होती.
हेही वाचा... 'वंचित'सोबतचे दरवाजे आता बंद - माणिकराव ठाकरे
2014 ची विधानसभा आणि आघाडीत बिघाडी
2014 लोकसभा निवडणुकांमधील अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आपली आघाडी मोडत निवडणूक वेगळ्याने लढवण्याचे ठरवले. यावेळी महत्वाची बाब म्हणजे जागावाटपावरून एकमत होऊ न शकल्यामुळे ज्या प्रमाणे भारतीय जनता पक्ष व शिवसेना ह्यांची २५ वर्षे सुरू असलेली युतीदेखील संपुष्टात आली होती, त्याच प्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची देखील आघाडी तुटली
2014 चा आघाडीचा जागावाटपाचा घोळ
आघाडीतील काँग्रेस पक्षाने 2009 च्या विधानसभा प्रमाणे जागावाटप करण्याचा आग्रह धरला होता. परंतू राष्ट्रवादी मात्र 141 - 141 म्हणजेच 50-50 च्या सुत्रावर ठाम होती. यामुळे पुढे जाऊन कोणताही तोडगा व न निघाल्याने आघाडी संपली, आणि महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढत झाली.
2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी १५ ऑक्टोबर २०१४ ला महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. 19 ऑक्टोबर 2014ला मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेला ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.
हेही वाचा... नेवासा विधानसभा मतदारसंघ: तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
2019 विधानसभा, आघाडीचे जागावाटप सुत्र आणि राष्ट्रवादीची सरशी
राज्यातील आगमी विधानसभेसाठी आघाडीचे जागा वाटप आता निश्चित झाले आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ तर मित्रपक्षांना ३८ या सूत्रानूसार जागावाटप झाले आहे. यामुळे 2014 च्या निवडणूकीत जिथे काँग्रेसने 50-50 चा फॉर्म्युला नाकारत आघाडी तोडण्याचे स्विकारले होते. त्याच काँग्रेसच्या सद्याच्या भुमिकेमुळे मात्र आघाडीमध्ये राष्ट्रवादीची सरशी झाली असल्याचे दिसून येत आहे.