मुंबई - महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली असून काँग्रेसचे १० आमदार ( Maharashtra Congress MLA will meet Sonia Gandhi ) सोनिया गांधींना दिल्लीत भेटले. सत्तेत असूनही दुजाभाव केला जातोय, असा संबंधितांचा आरोप आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल. दरम्यान, भेटीदरम्यान, आमदारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, की लोकशाहीसाठी कॉंग्रेस सत्तेत असणे आवश्यक आहे. पक्षातील गटबाजी रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
हेही वाचा -Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरेंना बेड्या ठोका -रेखा ठाकूर
महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रम स्थापन करून सत्तेत आले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार असल्याने अनेकदा नाराजी उफाळून आली आहे. काँग्रेसच्या आमदारांनी याबाबत पक्षश्रेष्ठींकडे वारंवार तक्रार केली. परंतु, सत्तेत असूनही हक्क मिळत नसल्याची तक्रार, आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्यांची नाराजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडे अनेकदा बोलून दाखवली. त्यानंतर आज काँग्रेसचे पंधरा आमदार दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. पुण्यातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहून राज्यातील राजकीय स्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी भेट देण्याची मागणी केली होती.