मुंबई- राज्यात असलेले सरकार हे केवळ लुटमार करण्यासाठी आले आहे. त्यामुळे त्यांना शेतकरी, सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे उरलेले नाही, अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
राज्यात 'यात्रा' बंद करून दुष्काळ जाहीर करा - विजय वडेट्टीवार वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियेतील प्रमुख मुद्दे;
शेतकऱ्यांची दूवा नाही बददूवाच मिळणार आहे, त्यात हे सगळे साफ होतील
यात्रा काढणे एवढेच काम सरकार करत आहे. जनआशीर्वाद, महाजनादेश यात्रा काढत आहेत, मात्र आज राज्यात शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकविमा मिळत नाही, कर्ज मिळाले नाही, दुसरीकडे पाउस पडत नाही, यामुळे यांना जन आशीर्वाद कसा मिळू शकेल, उलट शेतकऱ्यांची यांना बददूवाच मिळणार आहेत. त्यात हे सगळे साफ होतील, असे संतप्त विधान वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
भाजप-शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले आहेत
राज्यात आज दुष्काळी परिस्थिती असताना हे लोक माझा मुख्यमंत्री, माझा मुख्यमंत्री, यासाठी भांडत बसले आहेत. त्यामुळे यांना सरकार कोणासाठी चालवायचे आहे, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागावाटपावर ते म्हणाले की,आमच्या बैठकीत जागा वाटपाचा प्रश्न हा अर्ध्याहून अधिक विषय सुटला आहे. उर्वरित विषयावरही आमच्या काही वाद निर्माण होणार नाही. ज्या जागांवर ज्यांची अधिक ताकद आणि निवडून येण्याचा अधिक विश्वास असेल त्या जागा या त्या - त्या पक्षांना दिल्या जाणार आहेत. यामुळे आमच्यासोबतच्या इतर घटक पक्षांच्या जागा वाटपाचाही विषय हा लवकरच सुटणार असून येत्या १५ ऑगस्टपर्यंत जागा वाटप आणि त्याचा विषय सुटेल.
जागा वाटपावर केवळ जिंकून येणे हा एक फार्म्युला
जागा वाटपाच्या फार्म्युल्यावर विचारले असता ते म्हणाले की, आमचा जागा वाटपावर केवळ जिंकून येणे हा एक फार्म्युला ठरला आहे. त्यामुळे ज्यांची अधिक ताकद आहे, त्यांना त्या जागा देण्याचे आम्ही आघाडीत ठरवले आहे.. त्यामुळे कोणाला आधिक जागा हा विषय आमच्यासमोर नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रूपयांची मदत तसेच दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार यांनी यावेळी केली.