मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत(Kangana Ranaut Statement) हिने केलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्याबद्दल आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. कंगनाच्या वक्तव्याने फक्त भारतीय स्वातंत्र्य सैनिकांचाच नाही तर स्वातंत्र्य लढ्याचाही अपमान केला आहे. त्यामुळे करोडो देशभक्तांची मनं दुखावली आहेत. त्यामुळे तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर(Congress Leader Tariq Anwar) यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली आहे.
हेही वाचा -VIDEO : कलाकाराने कलाकारांच्याच हिशोबाने बोलावं - अभिनेता रमेश परदेशी
वरुण गांधी, नीलम गोऱ्हे, भाई जगताप यांचीही कंगनावर टीका -
अभिनेत्री कंगना रणौत हिने भारताच्या स्वातंत्र्याविषयी केलेल्या वक्तव्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर एका मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, रक्त वाहणारच होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहिती होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. १९४७ मध्ये जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होते, देशाला स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळालं आहे. त्यानंतर आता कंगनावर जोरदार टीका होत आहे. वरुण गांधी यांनीसुद्धा कंगनावर टीका केली आहे. अशा विचारसरणीला देशद्रोह म्हणायचे की वेडेपणा असं वरुण गांधी यांनी म्हटले आहे. तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीसुद्धा कंगनाला फटकारले असून तिला दिलेला पद्मश्री पुरस्कार तत्काळ काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशाला खरं स्वतंत्र २०१४ रोजी भेटले म्हणजे मोदी सरकार स्थापन झालं आणि खरं स्वातंत्र्य देशाला भेटलं, असं म्हणणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे, अशी टीकाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे.
मुंबईत 14 नोव्हेंबरपासून काँग्रेसचे आंदोलन-
कंगना रणौत यांनी देशाच्या स्वातंत्र्याविषयी केलेली टिपण्णी, तसेच राज्य आणि देशातील वाढती महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विविध प्रश्नांवर मुंबई काँग्रेसतर्फे सहा जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येणार आहे. ६ जिल्ह्यात १८ ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होणार असून, हे आंदोलन २९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. याची सुरुवात १४ नोव्हेंबरला मुंबईतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथून होणार आहे. तसेच याचे समापन चैत्यभूमी येथे होणार आहे. या आंदोलनामध्ये मुंबईतील त्याचबरोबर राज्यातील, देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहभागी होणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -युवक काँग्रेसकडून कंगनाच्या घराबाहेर जोरदार निदर्शने