मुंबई -मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान ( Tipu Sultan Sports Complex ) यांचे नाव द्यायचं ठरल आहे. यावरून आता महाराष्ट्र सरकार व भाजपा यांच्यात खडाजंगी रंगली आहे. मुंबई उपनगरातील मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून राजकारण तापलेले असताना आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी (Sachin Sawant slams BJP For Oppose Tipu Sultan) भाजपावर निशाणा साधला आहे. 2013 मध्ये मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते, असं ट्विट करत त्याबाबत भाजपा आता दुटप्पी भूमिका निभावत आहे, असे सांगितले आहे.
मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला शहीद टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावाच्या समर्थनासाठी दुथडी भरून भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपासाठी 2013 चे टिपू वेगळे, 2022 ला वेगळे! फरक हाच की तेव्हा निवडणूक नव्हती आणि आता आहे. या दुटप्पीपणाला काय म्हणावे?, असा सवाल सावंत यांनी केला. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले. तेव्हा तेथील अभ्यागत वहीमध्ये जे टिपू सुलतान बद्दल मत मांडले होते. आताची बदललेली संधीसाधू भूमिका ही सत्तेसाठी असून हा भाजपाच्या निर्लज्जतेचा कळस निश्चितच म्हणता येईल, अशी टीका सचिन सावंत यांनी केली.
भाजपाची सोयीची दुटप्पी भूमिका -
सचिन सावंत यांनी या ट्विट सहित दोन्ही घटनांचे पुरावे देखील दिले आहेत. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा शहीद टिपू सुलतानच्या कबरीवर गेले होते. तेव्हा तेथील अभ्यागत वहीमध्ये टिपू सुलतान हे शूर होते व ब्रिटिश विरोधात ते प्राणपणाने लढले, असे येडीयुरप्पा यांनी लिहिले आहे. त्याचमुळे मुंबई महानगरपालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन, असे सोयीचे राजकारण भाजपा करत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. 2013 मध्ये टिपू सुलतान यांच्या नावासाठी आग्रह धरायचा व आता सत्ता हातातून गेल्यानंतर पुन्हा निवडणुकीसाठी टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करायचा, अशी दुटप्पी भूमिका भाजपा करत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटले आहे.