मुंबई - प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी विविध समित्यांची पुनर्रचना करून विविध नेत्यांवर जबाबदारी दिली. यामध्ये माध्यम व संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्यावर दिल्याने नाराज होऊन या पूर्वीचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. माध्यम व संवाद विभागांमध्ये सचिन सावंत यांना समाविष्ट करण्यात आले आहे. परंतु मुख्य प्रवक्ते पदावरून त्यांना दूर लोटलं गेल्याने ते नाराज झाले आहेत.
सचिन सावंत हे मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र व काँग्रेसचा चेहरा बनले आहेत. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सातत्याने काँग्रेस व महाविकास आघाडीची बाजू मांडत आले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची त्यांचे संबंधही चांगले झाले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर ते सातत्याने टीकाटिपणी करत आले आहेत. राज्यपालांकडे पाठवल्या गेलेल्या विधान परिषदेसाठी १३ आमदारांच्या यादीत सचिन सावंत यांचे सुद्धा नाव आहे.