मुंबई -महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीत सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेसच्या बहुसंख्य नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षणात गेले आहेत. यामुळे महापालिका आयुक्तांनी मुंबईतून काँग्रेस संपवण्याची सुपारी घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते आणि पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
दिग्गजांचे आरक्षण - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर, अमेय घोले आदींच्या प्रभाग आरक्षित झाले आहेत. यासाठी त्यांना दुसऱ्या वॉर्डमधून संधी शोधावी लागणार आहे किंवा बाजूच्या प्रभागातून निवडून येवून तेथील नागरिकांची सेवा करावी लागणार आहे.
काँग्रेस न्यायालयात आव्हान देणार - काँग्रेसच्या वॉर्डना जाणिवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. हे आम्ही पहिली आणि दुसरी पुनर्रचना जाहीर झाली तेव्हाच निदर्शनास आणून दिले होते. आयुक्तांच्या मनमानी कार्यपद्धतीला काँग्रेसने कायम विरोध केला आहे. प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतरही आयुक्तांची मनमानी थांबलेली नाही. छुप्या पद्धतीने अनेक महत्त्वाचे निर्णय ते घेत आहेत. अनेक प्रस्तावांना आम्ही विरोध केला ते आयुक्तांनी मंजूर केले. त्याचा सूड आयुक्तांनी उगवला आहे. या आरक्षण बदलाविरोधात असल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे. रवी राजा यांच्या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यावर भाष्य करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी नकार दिला.