मुंबई- देशात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कग्रेसचे ज्येष्ठ नेते पुथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. यावेळी चव्हाण यांनी केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या 20 ऑक्टोबर 2020 च्या पत्रकार परिषदेचा दाखला दिला आहे.
चव्हाण म्हणाले, दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले होते की, “वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे. मागील दहा महिन्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि आतादेखील जाणवणार नाही." तसेच देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल सांगताना ते म्हणाले होते की,
1) केंद्र शासनाने देशभरातील ३९० दवाखान्यात PSA पद्धतीचे ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचे नियोजन केले आहे.
2) कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने 1 लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की सरकारने अतिरिक्त 1 लाख मेट्रिक टन ऑक्सिजन आयात, खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, त्यामुळेच आज देशात अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे.
ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या हताश नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला फोन येत आहेत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे, देशात ही परिस्थिती केंद्रसरकारमुळेच तयार झाली असल्याचा घणाघाती आरोप चव्हाण यांनी केला आहे.
तसेच केंद्र सरकारला त्यांनी काही प्रश्नही केले आहेत.