मुंबई - केंद्र सरकार सातत्याने इंधनाचे दर वाढवून तसेच रस्ते विकासाचे कारण सांगून सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची सातत्याने लूट करत आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी असतानादेखील केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवत आहे. जागतिक किंमतीनुसार पेट्रोल आज 34 रुपये लिटर मिळायला हवे, मात्र आज इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. यामागे फक्त केंद्र सरकार जबाबदार आहे. तसेच रस्ते विकासाच्या नावाखाली 18 रुपये सेस लावला जातो. हीदेखील जनतेची लूट असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.
'राज्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही'
इंधनाचे दर कमी करण्याचे सोडून भाजपाचे केंद्रातले मंत्री आणि राज्यातले विरोधी पक्ष राज्य सरकारकडे बोट दाखवते. मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यांनी राज्यात इंधनावर पाच वर्षात जवळपास ११ रुपये टॅक्स लावले. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत इंधनामध्ये केवळ एक रुपया वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याकडे बोट दाखवण्याचा नैतिक अधिकार भाजपाला नाही, असा टोला त्यांनी भाजपाला लावला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.
'सरकारी कंपन्या विकण्याचा मोदी सरकारचा घाट'
केंद्रातील मोदी सरकार एका मागून मागून एक सरकारी कंपन्या विकायला निघाली आहे. हा केंद्र सरकारचा घाट असून काँग्रेस असे होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. कंपन्या विकल्याने त्यामधील आरक्षणही संपुष्टात येणार असल्याची भीतीदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.