मुंबई -महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना या स्थितीचा मदत करण्याऐवजी केंद्राकडून याचे राजकारण होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने केवळ बिगर भाजपाशासित राज्यांचीच का निवड केली, असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केवळ दोन दिवसांचा लॉकडाउन जाहीर करून तितकासा फरक पडणार नसून अधिक कठोर नियम लावण्यात यावे, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले असल्याचे वृत्त आहे. यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा -कोल्हापुरात विनामास्क फिरणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
'...तर जनतेचा रोष अधिक वाढण्याची शक्यता'
महाराष्ट्र सरकारने कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" मोहिमेतर्गत कठोर निर्बंध लावले आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी राज्यात कडक लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या उपाययोजनांमुळे तितकासा फरक पडणार नसून अधिक कठोर निर्बंध लावण्याचे मत केंद्राच्या पथकाने व्यक्त केले आहे. एकीकडे राज्यात लॉकडाउनला जनतेचा तीव्र विरोध होत आहे. जमावबंदीअंतर्गत दिवसा जीवनोपयोगी वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ही व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध होताना दिसत आहे. या स्तिथीत अधिक कठोर निर्णय घेतल्यास जनतेचा रोष अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे केंद्रीय पथकाने अधिक कठोर नियम लावण्याचे मत व्यक्त करणे ही केवळ लुडबुड असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्राचे पथक बिगर भाजपाशासित पंजाब, छत्तीसगढ आणि पंजाबमध्येच का पाहणी करत आहे, इतर राज्यांत कोरोना नाही का, असेही त्यांनी म्हटले.