मुंबई -काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन त्यांनी विधान परिषेदेच्या रणनितीवर चर्चा केली. त्यानंतर जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार असल्याचे मत व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी -ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. आपण काँग्रेसचे दुसरे उमेदवार असलो, तरी ही निवडणूक केवळ आपल्यासाठी नसून महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्ष अशी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सांघिकरित्या नेतृत्व करत आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वास या भेटीनंतर भाई जगताप यांनी व्यक्त केला.