मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) ने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे. इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भारतीय जनता पक्षाचा दुतोंडीपणा आहे. कांद्याचे भाव वाढले तर शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडतील, परंतु भाजपला शेतकऱ्यांची चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त आहे.